छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या राज्यातील शेतकर्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. राज्य शासनाने छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि अमरावती या तीन विभागांसाठी एकूण १४ कोटी ९८ लाखांची मदत जाहीर केली असून, यापैकी छत्रपती संभाजीनगर विभागातील तीन जिल्ह्यांसाठी २ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. याचा फायदा विभागातील २ हजार ३७७ शेतकर्यांना होणार आहे.
राज्याच्या महसूल आणि वन विभागाने या मदतीचे आदेश जारी केले आहेत. एप्रिल महिन्यात अतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर महसूल विभागाने या नुकसानीचे पंचनामे करुन राज्य सरकारकडे मदतीचे प्रस्ताव सादर केले होते. राज्यातील पुणे, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तालयांकडून हे प्रस्ताव दाखल झाले होते. त्यानुसार राज्याच्या महसूल व वन विभागाने नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत मंजूर केली आहे. तिन्ही विभागांतील १६ हजार २६७ शेतकर्यांसाठी एकूण १४ कोटी ५८ लाख ९० हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. ही रक्कम डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात येणार आहे. पुणे विभागातील सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांसाठी ७ कोटी ९२ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील नांदेड, धाराशीव आणि हिंगोली जिल्ह्यांसाठी २ कोटी ९६ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. तर अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशी जिल्ह्यांसाठी ३ कोटी ६९ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.









